कळवण/देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रेम प्रकरणातून वाद निर्माण झाल्याने युवतीच्या कुटूंबियांनी युवकाच्या अंगावर पेट्रोल टाकून सदर युवकास जिवंत जाळण्याचा प्रकार लोहोणेर गावात घडला आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी देवळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लंबिग व्यवसायिक गोरख काशिनाथ बच्छाव याची रावळगाव येथील कल्याणी गोकुळ सोनवणे हिच्याशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. गोरखकडून कल्याणीला लग्नाची मागणी करण्यात आली. मात्र, कल्याणीच्या कुटुंबियांनी विरोध दर्शविला. यातून मोठा वाद निर्माण झाला. हे वाद मिटावेत म्हणून समझोता करण्याचा प्रयत्न झाला. आजही यासंदर्भात लोहणेर येथे बैठक होती. त्यासाठी सोनवणे कुटुंबिय आले होते. बैठकीत योग्य तोडगा न निघाल्याने वाद वाढला. सोनवणे कुटूंबियांकडून गोरख यास मारहाण करण्यात आली. हा वाद मिटविण्याचा काही ग्रामस्थांनी प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. गोरख यास लोखंडी रॉड व काठीने मारहाण करण्यात आली. याचदरम्यान गोरख हा स्व संरक्षणासाठी ओमसाई मोबाईल शॉपी या दुकानात घुसला. त्याचवेळी गोरख याच्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात गोरख सोनवणे हा सुमारे ३५ टक्के भाजला असून त्यास तातडीने पुढील उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी कल्याणी गोरख सोनवणे (वय २३), गोकुळ तोंगल सोनवणे (वय ५७), निर्मला गोकुळ सोनवणे (वय ५२), हेमंत गोकुळ सोनवणे (वय ३०), प्रसाद गोकुळ सोनवणे सर्व राहणार (बी.सेक्शन, रावळगाव) या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत निकम हे पुढील तपास करीत आहेत.