नवी दिल्ली – अफगाणिस्तानात बिघडत चाललेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचे विमान काबुलहून १२९ प्रवाशांना घेऊन दिल्लीत पोहोचले आहे. यामध्ये राजदूतांसह इतर अधिकार्यांचा समावेश आहे. जवळपास एक तास हवेत घिरट्या घातल्यानंतर विमानाला काबुल विमानतळावर उतरण्याची परवानगी मिळाली होती. हवेत असताना हल्ल्यापासून वाचण्यासाठी पायलटने विमानाचे रडार बंद केले होते. विमान दिल्लीत सुरक्षितरित्या उतरल्यानंतर एएनआय वृत्तसंस्थेने प्रवाशांशी संवाद साधला.
महिलांचे अधिकार संपुष्टात
या विमानातून प्रवास करून आलेल्या महिलेने दुःख व्यक्त केले. जगातील देशांनी अफगाणिस्तानला वार्यावर सोडल्याचे दुःख महिलेने रडत रडत व्यक्त केले. आमच्या सर्व मित्रांची आता ते लोक हत्या करतील. आमच्या महिलांना आता तिथे कोणतेच अधिकार मिळणार नाहीत, अशा भावना तिने व्यक्त केल्या.
अशरफ गनी जबाबदार
या विमानात अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामीद करझई यांचे नातेवाईक आणि माजी खासदार जमील करझई हे सुद्धा प्रवास करत होते. ते सांगतात, मी काबुल सोडल्यानंतर तालिबान्यांनी शहरावर कब्जा केला होता. माझ्या मते आता काबुलमध्ये नवे सरकार येईल. जे काही झाले त्याला अशरफ गनी जबाबदार आहेत. त्यांनी अफगाणिस्तानला धोका दिला आहे. लोक त्यांना कधीही माफ करणार नाहीत.
लोक बँकांकडे पळत होते
बंगळुरू येथील रहिवासी अब्दुल्लाह मसुदी या विमानाने दिल्लीला पोहोचला. अब्दुल्लाह बीबीएचे शिक्षण घेत होते. ते सांगतात, लोक बँकांकडे धावत होते. मी तिथे हिंसाचार पाहिला नाही. पण तिथे हिंसाचार होत नव्हता असा याचा अर्थ नाही. भारतात येण्याचे आधीपासूनच नियोजन केले होते. त्यांचे कुटुंब अजूनही अफगाणिस्तानात आहे. अनेक लोकांनी काबुल सोडले आहे.
काबुलमध्ये परिस्थिती शांत
अफगाणिस्तानचे खासदार कादीर जजई या विमानाने दिल्लीत पोहोचले. ते सांगतात, अफगाण सरकार आणि तालिबानदरम्यान शांतता करार झाला होता. आता सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेचे पालन केले जात आहे. काबुलमध्ये परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. पाकिस्तान तालिबानचा जवळचा समर्थक आहे. माझे कुटुंब अजूनही काबुलमध्ये आहे.
महिलांना परवानगी
अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींचे वरिष्ठ सल्लागार राहिलेले रिजवानुल्लाह अहमदजई सांगतात, अफगाणिस्तानच्या बहुतांश भागात शांतता आहे. जवळपास सर्व राजदूत, मंत्र्यांनी काबुल सोडले आहे. २०० लोक दिल्लीत दाखल झाले आहेत. हा नवा तालिबान आहे आणि तो महिलांना काम करण्याची परवानगी देईल.
आपल्या देशात पुन्हा जाईन
पक्तिया प्रांतातील खासदार सय्यद पक्तियावल यांनी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. आमच्या देशात परिस्थिती खूपच कठीण आहे. विशेषतः आजची रात्र सर्वात भीतीदायक आहे. मला देश सोडण्याची इच्छा नाही. मी येथे एका बैठकीत सहभागी होण्यासाठी आलो आहे. मी पुन्हा अफगाणिस्तानात परतेल.
ब्रिटेन, अमेरिकेकडून इशारा
वेगवेगळ्या देशांकडून अफगाणिस्तानच्या परिस्थितीबाबत इशारा देण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण घेऊ नये असा आदेश ब्रिटिश एअरवेजने त्यांच्या पायलटना दिला आहे. काबुलमधील अमेरिकेच्या दूतावासाने सुरक्षेचा इशारा जारी केला आहे. विमानतळावर परिस्थिती सामान्य नसून, आग लागण्याची घटना घडल्याचे वृत्त आहे.
#WATCH | "I can't believe the world abandoned #Afghanistan. Our friends are going to get killed. They (Taliban) are going to kill us. Our women are not going to have any more rights," says a woman who arrived in Delhi from Kabul pic.twitter.com/4mLiKFHApG
— ANI (@ANI) August 15, 2021