नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आम आदमी पक्षातील महत्त्वाचा चेहरा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईचा धसका ‘आप’ने घेतला आहे. पक्षातील त्यांचे वजन पाहता या कारवाईचा फटका पक्षालासुद्धा बसण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
सिसोदिया यांना कथित उत्पादन शुल्कप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यावरून राजकारण तापलेले असून या कारवाईचा आपवर काय परिणाम होणार, यादृष्टीनेही चर्चा रंगू लागल्या आहेत. एकीकडे आपला दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये मिळालेले यश पाहता या पक्षाने राष्ट्रीय राजकारणात येण्याचा संकल्प सोडलेला असताना दुसरीकडे पक्षातील सिसोदियांसारख्या प्रमुख नेत्यावर कारवाई संकट ओढवले आहे. याचा थेट परिणाम आपवर होणार आहे.
सिसोदिया यांच्याकडे शिक्षण, अर्थ, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह अशी एकूण अठरा वेगवेगळी खाती आहेत. त्यातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात आप सरकारने चांगले कार्य केले आहे. या दोन्ही क्षेत्रातील कामगिरीचे कौतुकही होत आहे. या पार्श्वभूमीवर सिसोदियांवरील कारवाई केजरीवालांच्या खच्चीकरणाचा भाग समजण्यात येत आहे.
अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री अटकेत
आप सरकार मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेणार आहे. त्यात दिल्लीचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. परंतु, अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्रीच उपलब्ध नसल्याचा प्रसंग सिसोदिया यांच्या अटकेने निर्माण झाला आहे.
कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम
सिसोदिया यांच्या अटकेचा केवळ आप सरकारवरच नव्हे तर कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम आहे. केजरीवाल हा पक्षाचा चेहरा असले तरी सिसोदिया हे प्रशासन, पक्ष संघटन यातील कणा आहे. परिणामत: सिसोदिया यांच्यावरील कारवाई आपला कमकुवत करण्याचा प्रयत्न मानला जात आहे. सिसोदिया हे पक्षाची रणनीती आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. असे असताना सिसोदियांच्या अटकेमुळे आप पक्षाच्या आगामी वाटचालीवर परिणाम पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Delhi AAP Manish Sisodia Arrest Politics Effect