नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी सैनिकांना आता आयुर्वेदिक उपचार मिळू शकणार आहेत. आयुष मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाचा (ECHS/DoESW)माजी सैनिक कल्याण विभाग/(ECHS), यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. माजी सैनिकांची योगदानात्मक आरोग्य योजनेच्या (ECHS) दवाखान्यांमध्ये आयुर्वेद उपचार पद्धतीला मंजुरी मिळाली आहे.
पाच वर्षांच्या कालावधीसाठी ओपीडी (OPD) सेवांमध्ये समाविष्ट करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. अंबाला, म्हैसूर, रांची, नागपूर, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, मेरठ, दानापूर आणि अलेपे (अलाप्पुझा) येथील 10 पॉलीक्लिनिकमध्ये (दवाखान्यांमध्ये) या सेवांची सुरुवात केली जाईल. अशी आयुर्वेद केंद्रे आधीच 37 छावणी रुग्णालये, एएफएमसी (AFMC) ची 12 लष्करी रुग्णालये आणि एएच आरअँडआर (AH R&R) मधील आयुर्वेद ओपीडी, हिंडन येथील एएफ (AF) रुग्णालय आणि पाच ईसीएचएस (ECHS) दवाखान्यांमध्ये कार्यरत आहेत.
आयुष मंत्रालयाच्या वतीने डॉ. मनोज नेसारी, सल्लागार (आयुर्वेद), आयुष मंत्रालय आणि मेजर जनरल एनआर इंदूरकर, एमडी, माजी सैनिक योगदानात्मक आरोग्य योजना आणि आयुष मंत्रालयाचे विशेष सचिव प्रमोद कुमार पाठक, ब्रिगेडियर जितेंद्र सिंग, कर्नल एसी निशिल,ईसीएचएस (ECHS) संचालक (वैद्यकीय) आणि आयुष मंत्रालयाचे इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या सामंजस्य करारानुसार सर्व ईसीएचएस (ECHS) सदस्यांना ऐच्छिक आधारावर या सेवांमध्ये मध्ये समाविष्ट करण्यासाठी भारतातील विविध प्रदेशातील 10(ईसीएचएस)ECHS पॉलीक्लिनिक/दवाखान्यांमध्ये आयुर्वेद ओपीडीची स्थापना केली जाईल. मंत्रालय वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन प्रदान करेल आणि आयुर्वेदिक डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांना त्यांच्या सहभागासाठी नियुक्त करेल आणि आवश्यक आयुर्वेदिक औषधांची यादी आणि आवश्यक असल्यास इतर तांत्रिक सहाय्य प्रदान करेल.
संरक्षण मंत्रालयाचा माजी सैनिक कल्याण विभाग/ईसीएचएस, संबंधित पॉलीक्लिनिकमध्ये योग्य ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा (खोल्या/फर्निचर/इतर सुविधा) प्रदान करेल तसेच आयुर्वेद तज्ञ, आयुर्वेद जनरल ड्युटी (सामान्य सेवा) वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची हंगामी पद्धतीवर नियुक्ती करेल. दैनंदिन कामासाठी आवश्यकतेनुसार सहायक कर्मचाऱ्यांची (प्रशासकीय, कारकुनी आणि बहु-कार्यकारी कर्मचारी) पूर्तता करेल.
या सामंजस्य करारानुसार, ओपीडी (OPD) स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी दोन्ही मंत्रालयांनी आयुष मंत्रालय आणि माजी सैनिक कल्याण विभाग/ECHS, संरक्षण मंत्रालय यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला एक संयुक्त कार्यगट (JWG) तयार करण्यास सहमती दर्शवली आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या विविध आस्थापनांमध्ये आयुष आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने परस्पर सहकार्य मजबूत केले आहे. 2019 च्या सामंजस्य कराराद्वारे एएच आरअँडआर (AH R&R) , हिंडन येथील एएफ (AF) रुग्णालय आणि पाच (05) ईसीएचएस (ECHS) दवाखान्यांच्या सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा सुविधांमध्ये आयुर्वेद ओपीडी सुरू करण्यात आली. नंतर 2022 मध्ये, 37 छावणी रुग्णालये आणि सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (AFMS) च्या 12 लष्करी रुग्णालयांमध्ये आयुर्वेद केंद्रे सुरू करण्यासाठी दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Defence Ex Serviceman Ayurvedic Treatment MOU Signed