इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– स्वयंपाकघरातील वनस्पती –
दालचिनी
दालचिनी आपण स्वयंपाकघरात नेहमी वापरतो. मसाल्याच्या पदार्थामधील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत, त्यात कुठले गुणधर्म आहेत हे आपण आता जाणून घेऊया…
आपण रोज स्वयंपाकात जो मसाला वापरतो त्यातला दालचिनी हा एक महत्वाचा घटक आहे. नुसती दालचिनी पण आपण वापरतोच. हिला संस्कृतमध्ये त्वक व इंग्रजीत सिनॅमन म्हणतात. याची साल वापरली जाते म्हणून त्वक (त्वचा) हे नाव. याचे झाड मध्यम उंचीचे असते. हिमालयात साधारण१.५ ते २००० मी उंचीपर्यंतच्या भागात याची झाडे वाढतात. श्रीलंका, चीन येथे पण दालचिनी होते. याची साल धुरकट तांबूस रंगाची, जाड व ठिसूळ असते. दालचिनीचे झाड तीन वर्षांचे झाल्यावर त्याची साल काढून वाळवतात व तिच्या लांब जुड्या करतात.ही सालच स्वयंपाक, औषधात वापरली जाते.
गुण:—-
दालचिनी पचायला हलकी, कोरडेपणा आणणारी, तीक्ष्ण, ऊष्ण आहे. ती चवीला तिखट, गोड व किंचीत कडू असते.
ऊष्ण गुणाने वातकफ कमी करते, पण पित्त वाढवते.
उपयोग :—
१)दालचिनी भूक वाढवणारी ,पचन चांगले करणारी आहे. यकृताचे कार्यपण चांगले करते. त्यामुळे पोटदुखी, भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, मूळव्याध यात उपयोगी पडते.
२) तोंडाची दुर्गंधी नाहीशी करणे,दात मजबूत करणे, तोंडाचा चिकटपणा घालवणे यात दालचिनी खूप उपयोगी पडते. यासाठी दालचिनीचा तुकडा तोंडात धरून ठेवावा. मळमळ थांबायलापण हिचा उपयोग होतो.
३)चेहऱ्यावर काळपट डाग येणे ,वांग येणे यात दालचिनीचा पातळ लेप घालतात.
४) डोकेदुखीवरपण हिचा लेप कपाळावर घालतात.
५) वेदनायुक्त सूजेवरही दालचिनीचा लेप उपयोगी पडतो.
६) दात किडून पोकळी झाली असेल व तिथे खूपच वेदना असतील तर दालचिनी तेल १-२ थेंब कापसाच्या बोळ्यावर घेऊन तो तिथे दाबून बसवावा. वेदना कमी होतात. पण हा उपाय नव्हे, दाताच्या डॅाक्टरांना अवश्य दाखवावे.
७)रक्तातील पांढऱ्यापेशींची संख्या वाढवणारी व रक्तशुद्धी करणारी आहे.
८)उत्तम जंतुघ्न म्हणून काम करते.
९) अपचनाने होणारे जुलाब, पोटातील मुरडा दालचिनीने बरा होतो.
१०) सर्दी मध्ये दालचिनी ,मिरे व आले एकत्र उकळून प्यावे.
११) अलिकडच्या संशोधनात असे आढळून आले कि दालचिनी सकाळची उपाशी पोटीची ( Fasting suger) साखर कमी करते.
दालचिनी पुलाव ,भात ,विविध करीज् करतांना एक घटक म्हणून वापरली जाते.
आयुर्वेदीय औषधांत दालचिनी ,वेलची ,तमालपत्र ,नागकेशर हे चारही बऱ्याच वेळा एकत्र वापरले जातात .यांना चातुर्जात म्हणतात.
लक्षात ठेवा …. दालचिनी मोठ्या प्रमाणात व सतत वापरली तर उष्ण पडते.त्यामुळे पित्त प्रकृतीत ,गर्भीणीत जपून वापरावी.
पाककृती :—
सिनॅमन टोस्ट :-
साहित्य :-
गव्हाचा स्लाइस पाव ६ , दालचिनी पावडर १ चमचा, लोणी ५ चमचे
कृती :-
टोस्टर मध्ये किंवा तव्यावर पावाचा टोस्ट करून घ्यावा. लोणी पातळ करून त्यात दालचिनी पावडर घालून फेटून घ्यावे. गरम टोस्ट वर हे मिश्रण लावावे . चहा किंवा दूधाबरोबर खायला द्यावे.
डॉ. नीलिमा हेमंत राजगुरु आयुर्वेदाचार्य मो. 9422761801. ई मेल – drneelimarajguru@gmail.com