इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशभरातील बँकांमध्ये सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सुरक्षा रक्षक देखील असतात. तरीही बँकेत दरोड्याच्या घटना घडतात. विशेषतः उत्तर प्रदेश व बिहारसारख्या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. सध्या देखील अशीच घटना उघड झाली आहे.चित्रपट स्टाईल प्रमाणे बँकेत दरोडा पडला आहे.
चित्रपट अभिनेता अक्षय कुमारच्या ‘स्पेशल-26’ चित्रपटात खोटी सीबीआय किंवा आयकर विभागाची टीम बनून चोरी केल्याचे दाखवण्यात आले आहे. तशाच प्रकारची घटना जमशेदपूरमध्ये घडली आहे. येथील बँक ऑफ इंडियामध्ये ‘स्पेशल-26’ स्टाईलने दरोडा टाकल्याची घटना समोर आहे. विशेष म्हणजे मास्क घातलेल्या चार चोरट्यांनी पिस्तुलाच्या धाकावर बँकेतील कर्मचाऱ्यांना बंधक बनवून 35 लाख रुपये लुटले. घटनेच्या वेळी बँकेत डझनभर ग्राहक होते, त्यांचे मोबाईलही चोरट्यांनी हिसकावले. विशेष म्हणजे, सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून दरोडेखोरांनी बनावट धाडीच्या नावाखाली बँक लुटली.
या घटनेची माहिती मिळताच एसएसपी प्रभात कुमार यांनी तपास केला. बँकेच्या आत ओलिस ठेवलेल्या ग्राहकांनी सांगितले की, मास्क घातलेल्या दरोडेखोरांनी आधी बँकेत प्रवेश केला आणि ग्राहकांचे मोबाईल घेतले. मोबाईल घेताना त्यांनी सीबीआचा छापा असल्याचे सांगितले. सुरुवातीला अनेक जणांना खरे वाटले. यानंतर दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आणि पिस्तुलचा धाक दाखवत बँकेतून 35 लाख लुटले. जाताना चोरट्यांनी गेटला बाहेरुन कुलूप लावले. नंतर ग्राहकांनी खिडकीतून बाहेर डोकावून आवाज दिला आणि इतरांना बँकेत दरोडा पडल्याचे सांगितले. भरदिवसा दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत तातडीने चौकशी करावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात येत आहे.
Dacoity State Bank of India looted 35 Lakh
Crime Jamshedpur