मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – या वर्षी सप्टेंबरमध्ये पालघर जिल्ह्यात झालेल्या कार अपघातात ज्येष्ठ उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनाहिता पंडोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारची डेटा चिप, मर्सिडीज बेंझचा अंतिम अहवाल आणि पंडोले यांचे पती दारियस पंडोले यांच्या जबानीच्या आधारे पालघर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
डॉक्टर पंडोले यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्यान्वये निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडोले, दारियस आणि मिस्त्री गुजरातहून मुंबईला येत असताना पालघरमधील सूर्या नदीच्या पुलावर कारला अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांच्यासह पंडोले यांचे भाऊ जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला.
डॉ. पंडोले यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दारियस यांना या आठवड्याच्या सुरुवातीला डिस्चार्ज देण्यात आला होता. दारियसने मंगळवारी त्याच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी पोलिसांसमोर जबाब नोंदवला. दारियस पंडोले यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची पत्नी डॉ. अनाहिता या मर्सिडीज बेंझ कार तिसर्या लेनमधून चालवत होती आणि पालघरमधील सूर्या नदीच्या पुलावर रस्ता अरुंद झाल्याने कार तिसर्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये जाऊ शकली नाही.
त्यांनी सांगितले की, जेव्हा तिने कार तिसऱ्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला उजवीकडे (दुसऱ्या लेनमध्ये) एक ट्रक दिसला. ज्यामुळे ती दुसऱ्या लेनमध्ये कार हलवू शकली नाही. ते म्हणाले की, सूर्या नदीच्या पुलावर हा रस्ता अरुंद होतो. त्यानंतर हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, पोलिसांनी दारियस पांडोलेचा जबाब नोंदवला आहे, मात्र त्यांची पत्नी डॉ. अनाहिता अद्याप रुग्णालयात असून तिच्यावर उपचार सुरू असल्याने तिचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही.
Cyrus Mistry Car Accident FIR Registered