नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागासाक्या धरणाच्या सांडव्यात एका तरुणाचा मतदेह सापडला आहे. या तरुणाला हातपाय बांधून धरणात फेकल्याचे निदर्शनास येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला आहे.
नांदगाव तालुक्यातील नांदूर येथील अमोल धोंडीराम व्हडगर (वय २२) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो रविवार सायंकाळपासून बेपत्ता होता. गावातील केसकर यांच्याकडे वरातीत नाचून येतो, असे सांगून अमोल घरातून निघाला होता. रात्री उशीरापर्यंत तो परतला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याची कसून चौकशी केली. अखेर तो सापडत नसल्याने पोलिसांकडे धाव घेतली. तो बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी दिली. त्यातच काही विद्यार्थी नाग्या-साक्या धरणाकडे फिरायला गेले होते. त्यांना धरणाच्या सांडव्याजवळ एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तत्काळ स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी समिरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे आदींनी घटनास्थळी भेट देत पुढील तपास सुरू केला आहे. या तरुणाची कुणी आणि का हत्या केली याचा तपास पोलिस करीत आहेत.