इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – आधुनिक काळात वेगवेगळे तंत्रज्ञान उपलब्ध झाले तरी त्यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील होत असल्याचे दिसून येते. विशिष्ट सोशल मिडीयाचा वापर करीत गुन्हेगारी वाढली असून यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यातच आजच्या काळात काही तरुणींना टिव्ही किंवा सिनेसृष्टीचे मोठे आकर्षण असते. त्यामुळे त्यांच्या या आकर्षणाचा फायदा घेऊन काही समाजकंटक त्यांची फसवणूक करतात, व्हिडिओ फिल्म, मोबाईल शूटिंग, युट्युबवर फिल्म बनवणे, यासारखे बरे-वाईट उद्योग आजच्या काळात सर्रासपणे चालतात. परंतु असे करताना काही तरुण हे साध्या भोळ्या तरुणी भूलथापा देऊन आपल्या जाळ्यात ओढतात. त्यातून मग विनयभंग, हिंसाचार, बलात्कारासारखे भयानक प्रकार घडतात. उत्तर प्रदेशात देखील अशीच एक घटना समोर आली आहे.
यूट्यूब फिल्म बनविण्याच्या नावाखाली तीन तरुणींची फसवणूक करण्यात आली. या तरुणींना नैनितालला घेऊन जाण्याचे आमिष देण्यात आले. चार तरुणांनी बरेली येथील गेस्ट हाऊस आणि रेस्टॉरंटमध्ये सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली.याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्कार, मारहाण, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तर दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. बरेली शहरातील बारादरी येथे राहणारी एक महिला आणि तिच्या दोन सहकारी महिलांना युट्यूब फिल्म बनवण्यासाठी नैनिताल येथे नेले जात होते. आरोपींनी त्यांना बहेडी येथील हॉटेल व गेस्ट हाऊसमध्ये नेले. हॉटेलमध्ये जेवणासोबत या अल्पवयीन तरूणी तथा महिलांना नशेचे औषध पाजण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला.
बलात्काराच्या घटनेनंतर तीन तरुण पळून गेले. शुद्धीवर आल्यानंतर एका महिलेने तिच्या कुटुंबीयांना बोलावले. त्यांनी तेथे पोहोचून एका तरुणाला पकडून बहेडी पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिस पथकाने नदीम (रा. धौरतांडा) याला ईशापूरजवळ अटक केली. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून घटनेत वापरलेली सुझुकी अर्टिगा कारही जप्त केली आहे. तसेच इरफान (रा. धौरतांडा, बरेली) याला अटक केली आहे. दरम्यान, एका २५ वर्षीय तरुणीने सांगितले की, यूट्यूबसाठी फिल्म बनवण्याच्या नावाखाली तिला नैनितालला नेले जात होते. रेस्टॉरंट व गेस्ट हाऊसमध्ये त्यांना जेवण दिले. मला ड्रग्ज दिले. त्यामुळे मी बेशुद्ध पडली. त्यानंतर आमच्यावर बलात्कार करण्यात आला.