मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नीरव मोदीच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला पुन्हा एकदा हजारो कोटींचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नीरव मोदीने १३ हजार कोटींनी पंजाब नॅशनल बँकेला लुटले आणि तो फरार झाला. नवे प्रकरण सतराशे कोटींच्या आसपास असले तरीही बँकेसाठी तो मोठा धक्का मानला जात आहे. आणि यावेळी कोण्या एका माणसाने नव्हे तर एका दिग्गज कंपनीनेच बँकेला लुटले आहे.
मुंबई येथील वद्राज सिमेंट कंपनीने पंजाब नॅशनल बँकेच्या अख्त्यारित येणाऱ्या १० बँकांना १६८८ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सीबीआयने दिल्ली येथे यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. गेली काही वर्षे पंजाब नॅशनल बँकेमागची विघ्न काही दूर होण्याचं नाव घेत नाहीयेत, असं दिसतय. कारण या नव्या प्रकरणातही देशभर जाळं असल्याचं पुढे आलं आहे. मुंबई, जयपूर येथेही विविध ठिकाणी छापे मारून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. कंपनीचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, ऋषी अग्रवाल आणि विजय प्रकाश शर्मा यांच्याविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
गुजरातसाठी कर्ज
वद्राज सीमेंट कंपनीने गुजरात राज्यातील सुरत शहरात मोरा या गावी सीमेंट निर्मितीचा प्रकल्प उभा करण्याकरिता पंजाब नॅशनल बँकप्रणित दहा बँकांकडून कर्ज घेतले. मात्र कर्ज मिळताच सगळी रक्कम उपकंपन्यांमध्ये ट्रान्सफर केली. त्यासाठी बनावट कंपन्या निर्माण केल्या. अखेर २०१८ मध्ये थकीत कर्ज खाते म्हणून घोषित करण्यात आले आणि सीबीआयकडे तक्रार करण्यात आली.
आता काय होणार?
नीरव मोदी याचे प्रकरण उघडकीस येईपर्यंत आणि पुढेही त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन बरेच दिवस होईपर्यंत तो फरार झाला होता. वद्राज कंपनीच्या प्रकरणात केवळ गुन्हा दाखल होऊन प्रकरण थांबले, तर असाच काहीसा अनुभव केंद्रीय तपास यंत्रणांना येऊ शकतो.
Crime Punjab National Bank 1688 Crore Fraud Delhi FIR
Vadraj Cement Company Cheating PNB