नाशिक – नाशिकरोड व सिन्नर येथे घरफोडी चोरी सारखे गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार राहुल दिलीप धोत्रे याला नाशिकरोड पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुस व पल्सर मोटार सायकल असा एकुण १ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रेकॉर्डवरील घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार राहुल दिलीप धोत्रे, (वय २२ वर्षे) सिन्नर फाटा परिसरामध्ये आलेला असून त्याचे जवळ बंदुकीसारखे हत्यार असल्याची खात्रीलायक बातमी नाशिकरोड पोलीस ठाणेचे पोलीस नाईक विशाल पाटील यांना मिळाली. त्यानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करून सदर ठिकाणी जाऊन सशंयीत आरोपीस ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. सदर सुचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी खर्जुल सर्कल या ठिकाणी साध्या वेषात सापळा रचला असता सदर ठिकाणी सराईत गुन्हेगार राहुल दिलीप धोत्रे हा मोटार सायकलवर आला. त्यावेळी त्यास पोलीस पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने लगेच पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडतीमध्ये एक गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुस व पल्सर मोटार सायकल असा एकुण १ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असल्यामुळे त्याचेविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात कलम ७१ / २०२२ भाहका ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनखाली अनिल शिंदे व सोमनाथ जाधव हे करीत आहे. आरोपी राहुल दिलीप धोत्रे याचेवर नाशिकरोड व सिन्नर पोलीस ठाणेस घरफोडी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत.