लासलगाव – हवामान विभागाने दिलेल्या अलर्ट नुसार निफाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर चांदोरी येथे तर गारपीट झाली लासलगाव येथे दोन तासाहून अधिक वेळ पावसाने जोरदार थांबून थांबून हजेरी लावली. लासलगाव बाजार समिती मध्ये असलेल्या पाऊस मापक यंत्रावर १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झालेल्या पावसामुळे लासलगाव, वेळापूर, पिंपळगाव नजीक, ब्राह्मणगाव (विंचूर), टाकळी पाचोरे खुर्द, पाचोरे बुद्रुक, कोटमगाव, विंचूर येथे शेतात सध्या कांदा काढणी सुरु आहे. शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे पीक ओला झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असून गेल्या दहा ते पंधरा दिवसांत कांद्याच्या बाजारभावात एक हजार रूपयांची मोठी घसरण झाली आहे. कांद्याला सर्वसाधारण अकराशे ते तेराशे रुपये इतका बाजार भाव मिळत असताना अशातच आता या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याने मातीमोल बाजार भावाने ओला झालेला विकण्याची वेळ जरूर कांदा उत्पादकांवर येणार असल्याचे दिसत आहे. यामुळे उत्पादन खर्चही भरून निघणार असल्याने कांदा उत्पादकांना आपला कांदा हा तोट्यात विक्री करण्याची वेळ भविष्यात येणार असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी राजाराम सोनवणे सांगत आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत द्राक्ष मातीमोल बाजार भावाने विकण्याची वेळ द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांवर आली होती. यंदा हिवाळ्यात थंडी जास्त दिवस राहिली शेकोट्या करून द्राक्षबागेत ऊब निर्माण करत द्राक्ष बाग फुलवली पण या आठवड्यात मंगळवारी वातावरणात बदल होत. संध्याकाळी निफाड येथे पाऊस झाला तर चांदोरी येथे गारपीटीसह जोरदार पावसाने हजेरी लावून आली आहे. लासलगाव जवळील ब्राह्मणगाव येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. पाचोरे खुर्द येथे वाल्मीक गायकवाड यांची दोन एकर द्राक्षबागेत सोसाट्याचा वाऱ्याने संपूर्ण द्राक्षबाग जमीनदोस्त केल्याने सहा ते सात लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आले आहे. तर ब्राह्मणगाव (विंचूर) येथील द्राक्ष उत्पादक सुनील गवळी यांच्या एक एकरावरील द्राक्ष बागेत द्राक्षाची फळधारणा चांगली झाली होती. २० ते २५ रुपये किलो दराने द्राक्षाचा व्यवहार झाला द्राक्ष बागेतील तीन रांगेत असलेल्या द्राक्षांची मंगळवारी काढणी झाली. मात्र बुधवारी पहाटे झालेल्या पावसानंतर द्राक्ष व्यापार्याने द्राक्ष काढण्यासाठी पाठ फिरवली व्यापाऱ्याकडे पाठपुरावा केला असता आठ ते दहा रुपयांनी उर्वरित द्राक्षांची मागणी केली आहे. आता काय करावे असा प्रश्न सुनील गवळी या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्या समोर उभा राहीला आहे.