नाशिक – आडगाव शिवारातील महामार्गाला लागून असलेल्या उज्वल अॅटो सर्व्हीस स्टेशन समोर पार्क केलेल्या अपघातग्रस्त मालट्रकमधील तब्बल २९० लिटर डिझेल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे स्कार्पिओमधून आलेल्या या चोरट्यांनी ही चोरी केली आहे. बाजीराव पुंजा जाधव (रा.आयोध्यानगरी,सिध्देश्वरनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जाधव यांच्या मालट्रकचा एमएच १५ एमएच २८११ अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाल्याने त्यांनी दुरूस्तीसाठी ट्रक पार्क केली होती. गेल्या शुक्रवारी (दि.४) स्कार्पिओ वाहनातून आलेल्या चार भामट्यांनी ट्रकच्या डिझेल टाकीचे मिटरगेजचे सेंसरचे नुकसान करून डिझेल पाईप कापून टाकीतील सुमारे २७ हजार २२० रूपये किमतीचे २९० लिटर चोरून नेले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार नरवडे करीत आहेत.