नाशिक : जिल्हा परिषदेचे सदस्य शंकर धनवटे यांनी एकलहरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक पेवळे यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यासह तीघांवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक पेवळे यांच्या पत्नी रंजना पेवळे (वय ४५ रा. एकलहरे गांव, मराठी शाळेच्या मागे) यांच्या तक्रारीवरुन शंकर धनवटे, निलेश विश्राम धनवटे, अतुल विश्राम धनवटे, राजाराम धोंडीराम धनवटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेवळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पती अशोक पेवळे, मुलगा स्वप्नील अशोक पेवळे आदी घराबाहेर शेकोटी करुन शेकत होते. त्यावेळी अशोक पेवळे यांनी गावातील एका व्हॉट्सअप ग्रुपवर गरीबात गरीब माणसाकडून महादेव मंदिरासाठी फुल नाही फुलाची पाकळी मिळाल्याबददल धन्यवाद, आभारी आहोत. असा मेसेज टाकला. याचा राग आल्याने शंकर धनवटे, निलेश धनवटे, अतुल धनवटे, राजाराम धनवटे आदीनी घराजवळ येत पती अशोक पेवळे, मुलगा स्वप्नील पेवळे यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यात फिर्यादी रंजना पेवळे यांची गळ्यातील पोत, कानातील झुबे पडून गहाळ झाल्याचे म्हटले आहे. घटनेनंतर नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप आदींनी भेट दिली. पुढील तपास पोलीस नाइक एस.एन.पाटील करीत आहे.