नाशिक – डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यू प्रकरणात वाजे कुटुंबीय आणि गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे. मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच आहे का, हे तपासण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट आला असून त्यात डीएनए एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता रिपोर्ट आल्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या तपासाला गती मिळणार आहे.
डॅा. वाजे यांचा मृतदेह काही दिवसापूर्वी वाडीवऱ्हे परिसरात पोलिसांना जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. हा मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचा असल्याची प्राथमिक माहिती होती. तत्पूर्वी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या पतीने वाजे यांच्यासंदर्भात मिसिंगची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकरणात तपास सुरु केला होता. आता डीएनए रिपोर्ट आल्यामुळे पोलिस डॉ. सुवर्णा वाझे यांना शहराबाहेर नेऊन त्यांची जाळून का हत्या करण्यात आली या दिशेने तपास करणार आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांची गाडी जाळण्यासाठी संशयिताने कोणत्या ज्वलनशील पदार्थाचा वापर केला, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या बहीण आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. माहेरच्या नातेवाईकांकडूनही काही माहिती घेतली आहे. तसेच डॉ. वाजे यांच्या पतीची विचारपूस केली आहे.