नाशिक – डोक्यावर बिअरची बाटली फोडत तरूणावर कोयत्याने वार; हल्लेखोराला अटक
नाशिक : भाभानगर भागात डोक्यावर बिअरची बाटली फोडत तरूणावर कोयत्याने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयीतास पोलीसांनी अटक केली आहे. यश राजेंद्र शिंदे (२१ रा.नागसेननगर, वडाळानाका) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत हल्लेखोराचे नाव आहे. तर राहूल पवार,सनी जगताप,सुजल शिंदे उर्फ गट्या, रवी गायकवाड व किशोर महाले आदी त्याचे साथीदार पसार झाले आहेत. याप्रकरणी मिलींद मनोहर भालेराव (३४ रा.नागसेननगर,वडाळाना) यांनी तक्रार दाखल केली आहे. भालेराव शनिवारी (दि.२२) रात्री वासन आय केअर हॉस्पिटल परिसरातून जात असतांना संशयीतांनी त्यास गाठले. यावेळी जुन्या वादाची कुरापत काढून संशयीतांनी लाथाबुक्यांनी मारहाण करीत भालेराव यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. तर एकाने धारदार कोयत्याने त्याच्यावर वार केले. या घटनेत भालेराव गंभीर जखमी झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.
ट्रक चालकास बेदम मारहाण; पंचवटी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल
नाशिक : जुन्या मालकाने वाहनाचा अपघात केला या कारणातून ट्रक चालकास बेदम मारहाण केल्याची घटना आडगाव नाका भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत मदन खाबिया (रा.त्रिकोणी बंगल्याजवळ,हिरावाडी) असे ट्रक चालकास मारहाण करणा-या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी सचिन प्रकाश देवकर (४२ मुळ रा.खेडी बु.जळगाव हल्ली आडगावनाका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. देवकर हे खाबिया यांच्या ट्रकवर चालक होते. मात्र वाहनाच्या अपघातानंतर ते दुस-याच्या वाहनावर नोकरी करीत आहेत. रविवारी (दि.२३) देवकर आडगाव नाका येथील एका चहाच्या टपरीवर उभे असतांना ही घटना घडली. संशयीत पूर्वीच्या मालकाने त्यास गाठून वाहनाचा अपघात केल्याचा राग मनात धरून त्यास शिवीगाळ केली. तुला माझ्या ट्रान्सपोर्ट परिसरात येवू नको असे सांगितले असतांना तू का आलास असे म्हणून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी पुन्हा इकडे आलास तर तूला पाहून घेईन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक भोये करीत आहेत.