नाशिक – गोव्याची दारू पाण्याच्या बाटल्यांमध्ये भरून मद्य तस्करी करणा-या पाच जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक पथकाने येवला येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात गोवा बनावटीच्या मद्याचे ३५० बॉक्स आणि आयशर गाडीचा समावेश आहे. आयशर ट्रक येवला तालुक्यात येत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार या भरारी पथकाने सापळा रचून दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई केली.गेल्या काही दिवसांपासून राज उत्पादन शुक्लच्या नाशिक विभागाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. गोवा तसेच दिव दमण येथील बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी गस्त वाढवली आहे. त्यामुळे सातत्याने कारवाई केली जात आहे.