नाशिकरोड – नाशिकरोड पोलिसांनी उपनगर पोलीस ठाण्यातील मोक्का व इतर गुन्ह्यातील फरार आरोपीस पुणे येथील वाकड परिसरातून अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव हुसेन फिरोज शेख (रा. सिन्नर फाटा) हे आहे. मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर तो गेल्या तीन वर्षांपासून फरार होता. पण, पोलिसांच्या पथकाने पुणे येथील वाकड परिसरामध्ये त्याचा शोध घेतला. हुसेन फिरोज शेख एक्टिवा गाडी वरती येत असतांना त्याला पकडण्याचा पोलीसांनी प्रयत्न केला. पण, त्याने छोट्या गल्लीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक पुणे पोलिस व नाशिकच्या पोलीस पथकाने त्याला शिताफीने अटक केली. सध्या तो नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील तपास नाशिक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक योगेश पाटील हे करत आहे. नाशिक रोड, उपनगर, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, सिन्नर व चांदवड या ठिकाणी येऊन गुन्हे करून दहशत माजवणा-या या गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांनी यश आले आहे.