नाशिक – नॉयलॉन मांजा विक्री करणा-या विरोधात अंबड पोलिसांनी रविवारी सिडकोत दोन ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ४१ हजार रुपयांचा घातक नॉयलॉन मांजा व मुद्देमाल जप्त करुन दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहे. पहिल्या कारवाईत खांडे मळ्यातील श्रीनाथजी पॅलेसनजीक असलेल्या दुकानात गोल्ड कंपनीचे नॉयलॉन मांज्याचे दहा गट्टू जप्त करण्यात आले. या मांजाची किंमत सहा हजार रुपये असून याप्रकरणी मयूर अशोक बदान (वय १९) गुन्हा दाखल केला आहे. तर त्रिमुर्ती चौकातील जय जगदंबे किराणा दुकानावर केलेल्या कारवाईत पोलिसांनी नॉयलॉन मांज्याचे ९ गट्टू मिळून आले. मोपेडसह मांजा असा ३५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी किरण राजेंद्र काकड (वय ३०, रा. गुरुदत्त चौक, सावतानगर, सिडको) याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.