नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई विनयनगर परिसरातील सप्तशृंगी मंदिर भागात करण्यात आली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक पितांबर गायकवाड (३८ रा.विनयनगर,भारतनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत तडिपाराचे नाव आहे. गायकवाड याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर पोलीसांनी एक वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांना मंगळवारी (दि.२१) रात्री तो आपल्या घरात असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी सापळा लावला असता तो पोलीसांच्या जाळ््यात अडकला. गुन्हे शाखेचे कर्मचारी दिलीप मोंढे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.