नाशिक : रिक्षा प्रवासात वृध्देच्या बॅगेतील सुमारे एक लाख रूपये किमतीचा सोन्याचा शाही हार सहप्रवासी असलेल्या भामट्यांनी हातोहात लाबविल्याची घटना अशोकस्तंभ भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमल वामन आहेर (७० रा.चंद्रमा हॉस्पिटल शेजारी,मखमलाबाद) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आहेर या बाहेरगावी गेल्या होत्या. रविवारी (दि.१२) त्या शहरात परतल्या असता ही घटना घडली. जुने सिबीएस येथून त्या दोन महिला व एक पुरूष सहप्रवासी असलेल्या रिक्षातून प्रवास करीत असतांना ही चोरी झाली. मखमलाबाद येथे जाण्यासाठी रिक्षा मार्गस्त झाली असता अन्य सहप्रवासी असलेल्या महिलांनी चालकास दाटीवाटी होत असल्याचे सांगून वाद घातला. त्यामुळे चालकाने अशोकस्तंभ भागातील कृष्णा वडापाव येथे आहेर यांना रिक्षातून उतरवून दिले. याच दरम्यान भामट्या सहप्रवास्यांपैकी कुणी तरी आहेर यांच्या बॅगेतील सुमारे एक लाख रूपये किमतीचा सोन्याचा शाही हार हातोहात लांबविला. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.