नाशिक – मालेगाव शहरात घरफोडी करणाऱ्या भामट्याला नाशिकच्या भगूरमधून अटक करण्यात आली आहे. अमीर सल्लौद्दिन शेख असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून जवळपास दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सोन्याची दागिने आणि मोबाईल फोनचाही समावेश आहे.
अधिक माहिती अशी की, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अंबादास बकाल यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे, भगूर येथे युसुफ शेख नामक संशयित चोरटा आलेला असल्याचे समजले. त्यावरून बकाल यांनी पोलीस नाईक सिद्धपुरे, यांना सांगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. यावेळी अमीर सल्लाउद्दीन शेख (वय १९, रा. रमजानपुरा, मालेगाव) यास ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे त्याने दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मालेगावात घरफोडी केल्याचे कबूल केले.
त्याच्याकडून सोन्याचे दागिने यात एक नेकलेस, दोन मंगळसूत्रे, कानातील टोप्स, चांदीचे दागिने, पायातील तीन पैंजण, वाळे, चांदीची चैन, एक मोबाईलअसा सुमारे १ लाख ६० हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान, हा संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून नाशिक ग्रामीण पोलिसांत त्याच्याविरोधात अनेक चोरीचे व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.