मुंबई – राज्याच्या व्यापार उद्योग व सेवा क्षेत्राची शिखर संस्था म्हणून कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर’ या संस्थेने महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी सुचविलेल्या विविध प्रस्तावावर प्राधान्याने विचार करू असे आश्वासन महाराष्ट्राचे पर्यटन पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री नामदार आदित्य ठाकरे यांनी अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्रातील पर्यटनाच्या विकासासाठी विविध प्रस्तावांचे निवेदन नामदार आदित्य ठाकरे यांना सादर केले व या विषयी चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी केली.
नामदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने दिलेल्या प्रस्तावांचा शासनाचे धोरणांमध्ये समावेश करण्यासाठी चेंबर चे पदाधिकारी यांच्या समवेत पर्यटन विभागाची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करू असे आश्वासनही यावेळी दिले. यावेळी चेंबरच्या ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करूनाकर शेट्टी,शुभांगी तिरोडकर, सुधाकर देशमुख यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.