नाशिक – दिंडोरीरोड भागात मद्याच्या नशेत असलेल्या मुलाने आईला ढकलून दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. घराबाहेर जाण्यास सांगितल्याने संतप्त मुलाने हे कृत्य केले आहे. या सर्व घटनेची मुलाने कबुली दिली आहे.
प्रशांत कचरू पवार (२८, रा. टाईप २/१, मेरी वसाहत) असे संशयिताचे नाव असून या घटनेत विमल कचरू पवार (वय६०) या वृध्देचा मृत्यु झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीतास दारूचे व्यसन असून गुरुवारी (दि.९) रात्री तो दारूच्या नशेत घरी परतला असता ही घटना घडली. मद्याच्या नशेत घरी आल्याने आई विमलबाई यांनी त्यास शिवीगाळ केली. घरात पाऊल ठेवायचे नाही असा सज्जड दम आईने दिल्याने दोघांमध्ये घरासमोरील अंगणातच शाब्दीक चकमक उडाली. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या संतप्त प्रशांतने आपल्या आईला धक्काबुक्की करीत लोटून दिले. त्यात वृध्द विमलबाई अंगणात पडलेल्या सिमेंटच्या प्लेंवर ब्लॉकवर पडल्या. या घटनेत माऊलीच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने त्या बेशुध्द झाल्या.
शुक्रवारी सकाळी प्रशांतची धुंद उतरल्याने ही घटना उघडकीस आली. रात्री झोपलेली आई दिवस उजाडूनही उठली नाही. त्यामुळे त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला असता तीचा मृत्यु झाल्याचे त्याला लक्षात आले. त्यानंतर त्याने दिंडोरी रोडवरील मेरी पोलीस चौकी गाठत चौकीतील कर्मचा-यांना माझी आई उठत नसल्याचे सांगितले. गांभिर्य ओळखून पोलीसांनी घटनास्थळी जावून खातर जमा केली असता घातपाताचा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांनीही घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पोलीसांनी प्रशांतची चौकशी केली असता वरील प्रकार समोर आला आहे. प्रशांतने आपबित्ती कथन करीत कबुली दिली असून त्यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.