नाशिक : उघड्या बंगल्यात शिरून चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. औद्योगीक वसाहतीतील सुर्यदर्शन कॉलनी भागात ही घटना घडली असून तब्बल साडे सात लाख रूपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ४८ हजार रूपयांच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर रामकृष्ण सांगळे (रा.गोदावरी बंगला,खोडे पार्क जवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सांगळे कुटूंबिय शुक्रवारी (दि.३) आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या बंगल्यात प्रवेश करून दोन्ही बेडरूममधील लाकडी व लोखंडी कपाटात ठेवलेली सुमारे ४८ हजार रूपयांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७ लाख ६० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत. दरम्यान पोलीसांनी परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला असून लवकरच ते हाती लागतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.