नाशिक : पंक्चर कारची स्टेपनी काढत असतांना भामट्यांनी दार उघडून दीड लाख रूपये असलेली बॅग हातोहात लांबविल्याची घटना औरंगाबादरोडवरील हॉटेल नांदूरनाका भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर देवराम आंधळे (रा.पाचोरे बु.ता.निफाड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आंधळे बुधवारी (दि.१७) शहरात आले होते. रात्री इनोव्हा कारने (एमएच १५ एचएम ६४३३) परतीचा प्रवास करीत असतांना ही घटना घडली. नांदूरनाका भागात कार पंक्चर झाल्याने त्यांनी आनंद कृषी अॅण्ड हार्डवेअर दुकानासमोरील राजगड हॉटेल समोर आपली कार पार्क करून डिक्कीतील स्टेपनी काढत असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारचे पुढील दरवाजा उघडून लेदरची हॅण्ड बॅग चोरून नेली. या बॅगेत १ लाख ४७ हजार ५०० रूपयांची रोकड होती. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.