नाशिक : किरकोळ कारणातून दुचाकीस्वाराने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या एका मद्यपीचा मृत्यु झाला. ही घटना चुंचाळे शिवारातील दत्तनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहितसिंग सुधीरप्रसाद सिंग (३२ रा.अंबासिक हॉटेल जवळ,एमआयडीसी) असे मृत मद्यपीचे नाव आहे. सिंग यास दारूचे व्यसन होते. गेल्या शुक्रवारी (दि.१२) रात्री कुणाल पगार नामक दुचाकीस्वार तुळजा भवानी मंदिराजवळील पायल किराणा दुकानासमोरून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. सिंग याने मद्याच्या नशेत दुचाकी अडवून आय अॅम सिंग इज किंग असे म्हणून मेरी नाद मे लगे तो काट डालूंगा अशी धमकी दिल्याने हा वाद झाला होता. संतप्त दुचाकीस्वाराने शेजारी पडलेले लाकडा दांडका उचलून सिंग यास बेदम मारहाण केली. या घटनेत लाकडी दांडक्याचा डोक्यात फटका मारल्याने सिंग रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला होता. सोमवारी त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी हवालदार टोपले यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.
 
			








