नाशिक : घरासमोर अनोळखी तरूणास मारहाण करीत असतांना वाद मिटविण्यासाठी गेलेल्या एकास तीन जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उपनगर भागात घडली. या घटनेत काठीने मारहाण करण्यात आल्याने सदर व्यक्ती जखमी झाला असून, त्यास आमच्या नादी लागला तर संपवून टाकू अशी टोळक्याने धमकी दिली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी धात्रक व त्याचे दोन साथीदार अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय राजेंद्र पगारे (रा.लक्ष्मी निवास,आनंद कॉलनी,महाराष्ट्र हायस्कूल जवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. शनिवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. संशयीत पगारे यांच्या घरासमोर अनोळखी तरूणास मारहाण करीत होती. त्यामुळे ते वाद मिटविण्यासाठी गेले असता ही घटना घडली. संतप्त टोळक्याने सदर अनोळखी युवकास सोडून देत पगारे यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी काठी डोक्यात मारण्यात आल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.