ओमनगर भागात घरफोडी; चोरट्यांनी लंपास केला १५ हजाराचा ऐवज
नाशिक : ओमनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी १५ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकड व चांदीचे दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद मधुकर व्यास (रा.हिरावाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. व्यास यांच्या ओमनगर भागातील गजरा एनक्लेव्ह या सोसायटीतील घरात ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली सात हजाराची रोकड व चांदीचे अलंकार असा सुमारे १५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.
इलेक्ट्रीक शॉक लागल्याने नाशिकरोड भागातील दोघांचा वेगवेगळया ठिकाणी मृत्यु
नाशिक : इलेक्ट्रीक शॉक लागल्याने नाशिकरोड भागातील दोघांचा वेगवेगळया ठिकाणी मृत्यु झाला. त्यात एका कामगारासह दहा वर्षीय बालीकेचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युच्या वेगवेगळय़ा नोंदी करण्यात आल्या आहेत. रोकडोबावाडीतील सोनाली दिनकर निकुंभ (रा.आण्णा गणपती जवळ) ही बालिका मंगळवारी (दि.९) आपल्या घराजवळ खेळत असतांना इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागल्याने ती जखमी झाली होती. कुटूंबियांनी तिला तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. दुसरी घटना दत्तमंदिर रोड भागात घडली. सचिन रमेश तुपलोंढे (३२ रा. हॅपीहोम कॉलनी,ना.रोड) हा कामगार बिटको फॅक्टरी जवळील डॉ.चिरमाडे यांच्या कन्स्ट्रक्शन साईटवर पाणी मारत असतांना त्यास उघड्यावर पडलेल्या इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागल्याने सहकारी कामगारांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. दोघी घटनांप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास अनुक्रमे जमादार कोकाटे आणि गोसावी करीत आहेत.