नाशिक : लॉकडाऊन मुळे शहरातील सर्व आस्थापना बंद असतांना मारूती व्हॅनमधून होणा-या दारू विक्रीचा पंचवटी पोलीसांनी भांडाफोड केला आहे. या कारवाईत पाच जणांच्या टोळक्यास बेड्या ठोकत पोलीसांनी वाहनासह सुमारे अडीच लाखाचा मद्यसाठा जप्त केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुर बोधक (रा.चौधरीमळा,मखमलाबाद),कपिल पगारे (रा.अवधूतवाडी,फुलेनगर),दिपक पोतदार (रा.चव्हाणनगर,आडगाव),प्रितम चौधरी (रा.गंगापूररोड) व रोहन शिंदे (रा.ट्रॅक्टर हाऊस,भद्रकाली) अशी संशयीत मद्यविक्रेत्यांची नावे आहेत. पोलीस नाईक रवी आढाव यांना गुरूवारी (दि.१३) सायंकाळी मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
एसटी डेपो समोरील चव्हाण बॅटरीज दुकाना मागील मोकळया जागेत पार्क केलेल्या वाहनातून मद्यविक्री होत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने पंचासमक्ष ही कारवाई केली. पोलीसांनी छापा टाकला असता संशयीत एमएच १५ के ८०३८ या मारूती व्हॅनमधून बेकायदा मद्यविक्री करतांना मिळून आले. या कारमध्ये १ लाख १५ हजार २०० रूपये किमतीचे ४० बॉक्स देशी दारूचे तर ८५ हजार ४४० रूपये किमतीचे १४ बॉक्स विदेशी दारूचे मिळून आले. या कारवाईत कारसह मद्य असा सुमारे २ लाख ४५ हजार ६४० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस शिपाई कल्पेश जाधव यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी अवैध दारू विक्रेत्यांवरील कारवाई बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक कुलकर्णी करीत आहेत. ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे निरीक्षक अशोक साखरे,सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार,पोलीस नाईक रवी आढाव,सागर कुलकर्णी,दिलीप बोंबले शिपाई कल्पेश जाधव,अंबादास केदार,घनश्याम महाले,नारायण गवळी,उत्तम खरपडे आदींच्या पथकाने केली.