सिडको व अंबड परिसरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच
नाशिक : सिडको व अंबड परिसरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरू असून गेल्या काही दिवसात औद्योगिक वसाहतीतून तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. सावतानगर येथील बजरंग चौकात राहणारे उमेश मुरलीधर पाटील हे ३ मार्च रोजी औद्योगिक वसाहतीतील लिअर अॅटोमेटीक लि. या कारखान्यात गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची मोटारसायकल एमएच १५ सीएफ ७५४७ चोरट्यांनी चोरून नेली. दुसरी घटना उन्नती इंजिनीअरींग कंपनीच्या पार्किंगमध्ये घडली. उन्निकृष्णन माणिकेन आजारिया (रा.अशोकनगर,सातपूर) गेल्या १५ मार्च रोजी कामानिमित्त उन्नती कारखान्यात गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची पल्सर एमएच १५ बीसी ५५७१ चोरट्यांनी पळवून नेली. तर किसन जवानसिंग पाटील (रा.माऊली चौक,दत्तनगर) हे २५ फेब्रुवारी रोजी गरवारे पॉईंट भागात गेले होते. सेवा अॅटोमोबाईल समोर पार्क केलेली त्यांची मोटारसायकल एमएच १५ डीएच ६०३१ चोरट्यांनी चोरून नेली. तिनही गुह्यांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास अनुक्रमे हवालदार टोपले व पोलीस नाईक बर्डे करीत आहे.
..
दुचाकी घसरल्याने चालक ठार
नाशिक : भरधाव दुचाकी घसरल्याने ४० वर्षीय चालक ठार झाला. हा अपघात चेहडी पंपीग परिसरात झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.दत्तात्रेय चंद्रभान सोनवणे (रा.चेहडी पंपीग,ना.रोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. सोनवणे गेल्या रविवारी (दि.९)रात्री आपल्या अॅक्टीव्हा दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. दुचाकीवर भरधाव वेगात घराकडे जात असतांना अचानक दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ धाडीवाल रूग्णालयात दाखल केले असता गुरूवारी (दि.१३) उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार नागरे करीत आहेत.
..