कोरोनाविरोधातील लढाईत भारताला लशीच्या स्वरूपात तिसरे शस्त्र आठवड्याभरात मिळण्याची शक्यता आहे. रशियाची स्पुतनिक-व्ही लस भारतात अगोदरच पोहोचली असून येत्या आठवड्यात ती आपल्याला उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे नीती आयोगाच्या आरोग्य समितीचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले आहे. रशियाहून आलेल्या मर्यादित लसीची विक्री उपलब्ध होणार आहे. जुलैपासून भारतात स्पुतनिक लशीचे उत्पादनही सुरू करण्यात येणार आहे. स्पुतनिक लसीची किंमत रेड्डीज लॅबने जाहिर केली असून या लसीचा एक डोस भारतीयांना ९९९ रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच, दोन्ही डोससाठी भारतीयांना १९९८ रुपये मोजावे लागणार आहेत.
भारतात स्पुतनिक लशींचे १५.६ कोटी डोस तयार करण्यात येणार आहे. देशात आतापर्यंत १८ कोटी कोरोना लशीचे डोस देण्यात आलेले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक २६ कोटी डोस देण्यात आले आहेत. कोरोना लसीकरणात भारत तिस-या स्थानी आहे. देशात ४५ वर्षांहून अधिक वयाच्या एक तृतीयांश लोकांना कोरोनाचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. ४५ किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ८८ टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या वयोगटातील लोकांचे लसीकरण करणे आवश्यक होते. आणि त्यावरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, असे पॉल म्हणाले.