नाशिक : सिन्नर तालूक्यातील बहुतांश हॉटेलमध्ये बेकायदा मद्य विक्री होत असल्याच्या माहितीवरून अप्पर अधिक्षक कांगणे यांनी धाडसत्र राबवत नाशिक – सिन्नर मार्गावरील वेगवेगळया ठिकाणच्या हॉटेलवर छापा टाकत८५ हजार २२५ रूपये किमतीचा देशी आणि विदेशी मद्यसाठा हस्तगत केला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. सिन्नरमधील एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील मोह गावाच्या शिवारात असलेल्या नाशिक सिन्नर रोडवरील हॉटेल नाना का ढाबाच्या पाठीमागील पत्र्याचे शेडमध्ये अवैध बेकायदेशीर पद्धतीने मद्य विक्री होत असल्याचे समजले. त्यानुसार त्यांच्या पथकाने छापा मारून अकबर सत्तार शेख, (३०, रा शालिमार, नाशिक, सध्या हॉटेल नाना का ढाबा) यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात एकूण ४०,३७५/- रुपये किमतीचा अवैध दारुसाठा मिळून आला. दुसरी कारवाई नाशिक सिन्नर हायवेवरील मोह गावच्या शिवारातील हॉटेल साई दरबारचे पाठीमागील पत्र्याचे शेडमध्ये करण्यात आली. येथे बेकायदेशीर दारूची साठवणूक करून विक्री करण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी पोलिसांनी दिलीप शामराव कदम, (५४, रा संगळीवाडी, ता. मिरज, जि. सांगली, सध्या रा. हॉटेल साई दरबार) यास ताब्यात घेतले. कदमकडून ४४,८५० रुपये किंमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला. विशेष पथकातील भाऊसाहेब टिळे आणि गणेश वराडे यांचे फियार्दीवरून सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक रावसाहेब कांबळे, भाऊसाहेब टिळे, सचिन देसले, गणेश वराडे आदींनी ही कामगिरी केली.