४८ वर्षीय महिलेचा मृत्यु
नाशिक : इमारतीच्या टेरेसवर व्यायाम करीत असतांना तोल जावून पडल्याने ४८ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. ही घटना अशोकस्तंभ भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. प्रिया सतीश मटुमल (४८ रा.विठ्ठल पार्क अशोक स्तंभ) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रिया मटुमल या मंगळवारी (दि.१२) आपल्या राहत्या इमारतीच्या टेरेसवर नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी गेल्या होत्या. व्यायाम करीत असतांना अचानक तोल गेल्याने त्या जमिनीवर कोसळल्या होत्या. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांसह शेजा-यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भोये करीत आहेत.
दोन महिलांचे मंगळसूत्र खेचले
नाशिक : शहरात चेनस्नॅचरांनी धुमाकूळ घातला असून, मंगळवारी (दि.११) वेगवेगळ्या भागात झालेल्या दोन घटनांमध्ये पादचारी महिलांच्या गळयातील सुमारे अडीच लाख रूपये किमतीचे अलंकार भामट्यांनी ओरबाडून नेले. याप्रकरणी उपनगर आणि अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकरोड येथील शिवाजीनगर भागात राहणा-या हिरा जयवंत फापाळे (रा.गुरूप्रसाद सोसा जवळ,रामदास स्वामी नगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास त्या आपले ब्युटी पार्लरचे दुकान बंद करून घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. टाकळी रोडवरील रामदास स्वामी मार्गाने त्या पायी जात असतांना गुरूप्रसाद सोसायटीच्या गल्लीत समोरून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळयातील सुमारे २५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. दुसरी घटना सिडकोतील कामटवाडा भागात घडली. संगिता अतुल बोरटक्के (रा.संगिता पार्क,अंबिकानगर) या मंगळवारी रात्री नेहमी प्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. शुभम पार्क पर्यंतचा फेरफटका मारून त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. नरोडीया हाऊस भागातून त्या पायी जात असतांना समोरून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळय़ातील सुमारे २ लाख ३२ हजार रूपये किमतीचे दोन मंगळसूत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक नाईद शेख करीत आहेत.