नाशिक : घरखाली करतांना किरकोळ कारणाच्या वादातून शेजा-यास लोटून दिल्याने त्याचा मृत्यु झाल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील सरस्वती चौकात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोघा भावांविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल बाबुराव मगरे आणि राष्ट्रपाल बाबुराव मगरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. या घटनेत जितेंद्र सत्यनारायण तिवारी (३५ रा.भापकर गॅरेज समोर सरस्वती चौक,शिवशक्ती चौक अंबड) यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी शालिनी तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मगरे बंधू आणि तिवारी एकमेकांचे शेजारी होते. मगरे बंधू काही महिन्यांपूर्वीच तिवारी यांच्या शेजारी विनोद बागुल यांच्या घरात भाडे तत्वावर राहण्यास आले होते. दोघा कुटूंबियात नेहमी वाद होत असत मद्याच्या नशेत मगरे बंधू शिवीगाळ करीत असल्याने तिवारी दांम्पत्याने घरमालकाकडे तक्रार केली होती. त्यावरून दोन्ही कुटूंबियात मतभेद वाढले होते. मगरे यांनी काही दिवसांपूर्वीच दुसरे घर शोधून काही सामान नेले होते. सोमवारी (दि.४) दोघे बंधू उर्वरीत सामान घेण्यासाठी आले असता ही घटना घडली. घरास कुलूप असल्याने मगरे बंधूनी तिवारी यांच्या पत्नीस शिवीगाळ केली. यावेळी तिवारी यांनी पत्नीस शिवीगाळ केल्याचा जाब विचारला असता संशयीतांनी दारातून ओढून तिवारी यांना ढकलून दिले. या घटनेत तिवारी दरवाजा समोरील सिमेंटच्या ढाप्यावर तोंडघशी पडल्याने गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक राजपूत करीत आहेत.