नाशिक – यंदा इयत्ता बारावी (सायन्स) मध्ये शिकणारा येथील वेदांत कुलकर्णी याने मोठे यश मिळविले आहे. त्याला थट इटलीतील आंतरराष्ट्रीय परिषदेचे निमंत्रण मिळाले आणि त्याने या परिषदेत सक्रीय सहभाग घेत नाशिकचे नाव जगभरात उंचावले आहे.
वेदांतने इयत्ता दहावी मध्ये आयसीएसई बोर्डात 98.20% मिळविले. त्यानंतर तो आता इयत्ता बारावीचे शिक्षण घेत आहे, कोरोनामुळे सध्या त्याचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. याच दरम्यान त्याला अनोखी संधी चालून आली आणि त्याचे त्याने सोने केले आहे.
पृथ्वीवर सतत बदलणारे हवामान, त्याची तीव्रता आणि त्याचा मानवावर होणारा परिणाम तसेच यासाठी एक युवा नागरिक म्हणून आपली भूमिका, जागरूकता, आणि त्या संवेदनशीलतेतून होणारे योगदान अशा पद्धतीने संशोधनात्मक स्तरावर चालणाऱ्या कार्यात वेदांत ऑनलाईनरित्या सहभागी होत गेला. कार्यतत्परता व कौशल्य व योगदानामुळे त्याची महती आंतरराष्ट्रीय परिषदेच्या कार्यकारिणी मंडळ व आयोजकां पर्यंत पोहचली. त्याची काम करण्याची पद्धत पाहून त्याला गव्हर्नन्स टीममध्ये सामील करण्यात आले.
इटली येथे होणा-या या ऑफलाईन कॉन्फरन्ससाठी वेदांत हा मानकरी ठरला. विशेष म्हणजे भारतातील तो एकमेव निमंत्रित होता. त्याला इटली सरकारकडून या कॉन्फरन्ससाठी खास आमंत्रित करण्यात आले. आजच्या युवापिढीने ऑनलाईन वर्क हे प्रगतीला अडथळा नसून वरदान आहे आणि त्याकडे एक सुवर्णसंधी म्हणून बघितले पाहिजे, हे त्याने सिद्ध केले आहे.
सोशल मिडिया हे जगाला अशाही पद्धतीने एकमेकांशी जोडू शकते, सर्वांना एका चांगल्या कार्यासाठी प्रेरित व केंद्रीत करून एकत्र आणू शकते यासाठी “युथ फॉर क्लाइमेट कॉन्फरन्स” घेण्यात आली. इटलीतील मिलान येथे गेल्या महिन्यातच (सप्टेंबर) मध्ये ही परिषद संपन्न झाली. या परिषदेत वेदांतने सक्रीय सहभाग घेतला आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.