नाशिक – द्वारका परिसरातील टॅक्टर हाऊस भागात पहाटे खून झाल्याची घटनेची चर्चा होती. पण, मयत हा चोरी करत असतांना तिस-या मजल्यावरुन खाली पडल्याचे समोर आले आहे. त्याच्या साथीदारानी औषधोपचारासाठी त्याला रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. ते रिक्षाची बराच वेळ वाट बघत होते. पण, रिक्षा न मिळाल्याने साथीदार निघून गेले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदू उर्फ भोला सामा रहासे (रा.मांडवी खुर्द, नंदूरबार) असे मृत तरूणाचे नाव आहे. चंदू रहासे सोमवारी (दि.२०) पहाटेच्या सुमारास टॅक्टर हाऊस जवळील नवीन बांधकाम सुरू असलेल्या स्टार लाईन या इमारतीवर लोखंडी सळई – गज चोरी करण्यासाठी गेला होता. चोरी करीत असतांना इमारतीच्या तिसºया मजल्यावरून तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. अन्य साथीदारांनी त्यास काही अंतरावरील महामार्गावर आणून उपचारार्थ घेवून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच अॅटोरिक्षा न मिळाल्याने भितीपोटी ते पसार झाले. गंभीर अवस्थेत भोलाने अमृतविनायक बिल्डींग समोरील महामार्गाच्या सबवेने जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो उड्डाणपुलाखालील पोल नं. ७३ ते ७५ दरम्यानच्या झाडाझुडपात पडला. अतिरक्तश्रावामुळे त्याचा जागीच मृत्यु झाला. ही घटना सकाळी उघडकीस आली. शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरीकांनी या घटनेची माहिती भद्रकाली पोलीसांना दिल्याने पेट्रोलींगवर असलेले उपनिरीक्षक धर्मेंद पवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ वरिष्ठ निरीक्षक संभीजी निंबाळकर,निरीक्षक दत्ता पवार,दिलीप ठाकूर,सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते,शिवाजी आहिरे,संजय बिडगर उपनिरीक्षक जितेंद्र माळी,विलास मुंढे,भास्कर गवळी आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत प्रथम दर्शनी खूनाच्या संशयातून शोध सुरू केला. शितळादेवी मंदिर परिसरात राहणा-या मृताच्या मित्रास गाठून अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. पोलीस तपासातून चोरीचा हा प्रकार समोर आला असून, मृतांच्या साथीदारांची चौकशी सुरू आहे. पोलीस उपायुक्त संजय बारकुंड,अमोल तांबे सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना,नवलनाथ तांबे आदींच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.