पैशांची बॅग साभांळण्यास सांगून महिलेचे दोन लाख लाखाचे दागिने केले लंपास
नाशिक : पैशांची बॅग साभांळण्यास सांगून महिलेचे दोन लाख रूपये किमतीचे दागिने भामट्यांनी लांबविल्याची घटना वर्दळीच्या रविवार कारंजा भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुसूम किशोर चाफेकर (रा.चिंचबनरोड, मालेगाव स्टॅण्ड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चाफेकर या गुरूवारी (दि.१२) सकाळच्या सुमारास रविवार कारंजा भागात गेल्या होत्या. रंगोली नॉव्हेल्टीज या दुकानासमोरून त्या जात असतांना ३० ते ३५ वयोगटातील तिघांनी त्यांना गाठले. लाखोंची रोकड बॅगेत असल्याची बतावणी करीत हा गंडा घालण्यात आला आहे. चाफेकर यांचा विश्वास संपादन करून भामट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. यावेळी पैशांची बँग जड असल्याने घेवून फिरता येत नाही असे म्हणत त्यांनी बॅग सांभाळण्यासाठी चाफेकर यांच्या ताब्यात दिली. विश्वासाने पैसे तुमच्या ताब्यात देत असल्याचे सांगून त्यांनी चाफेकर यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या आणि सोनसाखळी असा सुमारे २ लाख रूपये किमतीचे अलंकार आपल्या पदरात पाडून घेत पोबारा केला. बराच वेळ उलटूनही भामटे न आल्याने महिलेस संशय आल्याने तिने बॅग उघडून पाहिली असता फसवणुकीचा प्रकार समोर आला. बॅगेत पैसेच नसल्याचे समोर आल्याने चाफेकर यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अशोक काकवीपुरे करीत आहेत.
..
तलवार घेवून फिरणा-याला अटक
नाशिक : दहशत माजविण्यासाठी तलवार घेवून फिरणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई फुलनेगर भागात करण्यात आली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल श्रावण सोनवणे (२० मुळ रा.गोंदेगाव जि.औरंगाबाद हल्ली फुलेनगर) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. फुलेनगर येथील कालीका मंदिर परिसरात एक तरूण हातात तलवार घेवून फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पंचवटी पोलीसांनी धाव घेतली असता संशयीत सोनवणे पोलीसांच्या जाळय़ात अडकला. गुरूवारी (दि.१२) रात्री तो परिसरात आपली दहशत कायम राहवी यासाठी तलवार घेवून फिरत होती. त्याच्या ताब्यातून धारदार तलवार हस्तगत करण्यात आली असून पोलीस नाईक दिलीप बोंबले यांनी दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी शस्त्रअधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक कुलकर्णी करीत आहेत.
….
दोन दुचाकी चोरीला
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच असून नुकत्याच दोन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी सरकारवाडा आणि आडगाव पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देवळाली कॅम्प येथील गावडे मळ्यात राहणारे हेमंत चंद्रकांत गायकवाड गेल्या मंगळवारी (दि.३) शरणपूररोडवरील पंचायत समिती कार्यालयात कामानिमित्त गेले होते. पंचायत समितीच्या आवारात पार्क केलेली त्यांची एमएच १५ ईयू २१८६ दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार लांडे करीत आहेत. दुसरी घटना तपोवनात घडली. शिवाजी दत्तू बर्डे (रा.शंकरनगर,द्वारका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बर्डे गेल्या शनिवारी (दि.७) औरंगाबादरोड ते तपोवन या मार्गावरील एसटी डेपो भागात गेले होते. एसटी डेपो परिसरात पार्क केलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १९ एझेड २३२९ अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.