नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हार्डवेअरच्या दुकानातून पोलिसांनी १२ कोयते जप्त केले आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक शहरांसह नाशिक शहरात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्या हातात प्राणघातक कोयते घेऊन परस्पर विरोधी टोळीवर हल्ला करणे, सामान्य नागरिकांना लुटण्यासाठी कोयत्याचा वापर करणे, दहशत पसरविण्यासाठी हातात कोयते घेऊन धिंगाणा घालणे, दरोडा टाकण्यासाठी कोयत्याचा वापर करणे होत असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबड लिंकरोडवरील संजीव नगर येथील संशयित महेबूब मुझम्मिल खान ३९ रा. संजीवनगर याच्या न्यू बबलू हार्डवेअर नावाच्या दुकानातून हे बारा प्राणघातक कोयते पोलिसांनी जप्त केले.