नाशिक : दिंडोरी येथे पाहुणी म्हणून गेलेल्या देवळाली कॅम्प येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी गरोदर राहून बाळंतीन झाल्याने हा प्रकार पोलिसात ठाण्यात पोहचला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची दिंडोरी येथे घडल्याने हा गुन्हा दिंडोरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ही अल्पवयीन मुलगी दिंडोरी येथे मामाच्या गावाला गेली होती. २५ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यान मामीच्या बहिणीच्या मुलाने तिच्याशी ओळख वाढवित प्रेमसंबध प्रस्थापित केले. या काळात त्याने बदनामी करण्याची धमकी देत वेळोवेळी बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर आपल्या घरी परतलेल्या मुलीचे अचानक पोट दुखू लागल्याने २४ मे रोजी आजीने तिला रूग्णालयात दाखल केले. येथे ती गरोदर असल्याची माहिती समोर आली. प्रसूतीत तिने एका मृत बाळाला जन्म दिला होता. मात्र रक्तपुरवठा सुरळीत न झाल्याने बाळ दगावल्याचा अंदाज वैद्यकीय सूत्रांनी वर्तविला असून याप्रकरणी आजीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी नातेवाईक तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वैशाली मुकणे करीत आहेत. दिंडोरी येथे ही घटना घडल्याने हा गुन्हा दिंडोरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.