रिक्षाप्रवासात महिलेच्या पर्स चोरट्यांनी केली लंपास; ६८ हजार ५०० रूपयांचा ऐवज लांबविला
नाशिक : नांदूरनाका ते जेलरोड दरम्यान रिक्षाप्रवासात महिलेच्या पर्स मधील रोकड व दागिणे चोराने लंपास केले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मिता विलास कुशारे (३५ रा.शिवरामनगर,जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुशारे कुटूंब मंगळवारी नांदूरनाका भागात गेले होते. दुपारच्या सुमारास कुशारे दांम्पत्यासह मुलगी नांदूरनाक येथून रिक्षातून घराकडे परतत असतांना ही घटना घडली. रिक्षा प्रवासात सह प्रवासी असलेल्या भामट्या प्रवाश्याने कुशारे यांच्या पर्स मधील रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६८ हजार ५०० रूपयांचा ऐवज हातोहात लांबविला. अधिक तपास पोलिस नाईक चव्हाण करीत आहेत.
पेट्रोलसाठी पैसे दिले नाही म्हणून दुचाकीस्वारांनी केली मारहाण
नाशिक : इच्छामणी रोड भागात पेट्रोलसाठी पैसे दिले नाही या कारणातून दुचाकीस्वारांनी एकास बेदम मारहाण करुन कोयत्याने हल्ला केला. या घटनेत सदर व्यक्ती जखमी झाला असून, एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव बाबाजी पाटेकर (१९ रा.हॉली फ्लॉवर स्कूल जवळ,नारायण बापूनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याचा बिट्टू सौदे (२० रा.नाव गाव पूर्ण नाही) नामक साथिदार अद्याप फरार आहे. याप्रकरणी राजीश गणपत जाधव (४० रा.जाधव वाडी,पंचशिलनगर,गोरेवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि तक्रारदार एकमेकांचे परिचीत असून मंगळवारी (दि.२४) जाधव इच्छामणी रोडवरील सुश्रूषा हॉस्पिटल भागात असतांना दुचाकीवर आलेल्या दोघानी त्यांना गाठले. यावेळी संशयितांनी पेट्रोल भरण्यासाठी जाधव यांच्याकडे पैश्यांची मागणी केली. मात्र जाधव यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संशयितांनी शिवीगाळ करीत त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संपप्त संशयित पाटेकर यांने त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केला. या घटनेत कोयत्याच्या वार चुकवतांना जाधव यांच्या हातास मोठी दुखापत झाली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.