नाशिक : दोन वेगवेगळया अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाल्याच्या घटना शहर व परिसरात झाल्या आहे. एका अपघातात जय तुळजा भवानी वजन काट्यासमोर हायवा मालट्रकवर दुचाकी आदळून एकाचा मृत्यू झाला. तर दुस-या अपघातात दोन दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. या दोन्ही अपघातात संभाजी शिवाजी पवळे (३३), मुबीन गफ्फार मनियार (३२) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
एकलहरा येथील मळे वस्ती भागात राहणारे संभाजी शिवाजी पवळे (३३) शुक्रवारी रात्री शिंदे पळसे येथून ओढा गावाच्या दिशेने आपल्या दुचाकीवर एमएच १५ सीएन ७५६६ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. लाखलगाव शिवारातील बायपास रोडने ते प्रवास करीत असतांना जय तुळजा भवानी वजन काट्यासमोर हायवा मालट्रकवर (एमएच १५ एचएच ८४१७) दुचाकी आदळली. या अपघातात पवळे गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात हायवा चालकाच्या हलगर्जी पणामुळे झाला. पार्किंग इंडिकेटर न देता संशयिताने अंधारातील भररस्त्यात आपेल वाहन पार्क केल्याने दुचाकी मालट्रकवर आदळली. याप्रकरणी बाळासाहेब पवळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत. दुसरा अपघात नाशिकरोड येथील महात्मा गांधी रोडवर झाला. निफाड तालुक्याती चित्तेगाव येथील मुबीन गफ्फार मनियार (३२) हे देवळालीगावातील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. सोमवारी पॅशन मोटारसायकलने ते एमएच १५ ईझेड ५८९७ परतीच्या प्रवासास लागले असता हा अपघात झाला. देवळाली गावातून ते बिटको पॉईंटच्या दिशेने जात असतांना महात्मा गांधी रोडवरील सागर मेडिकल भागात विरुध्द दिशेने भरधाव आलेल्या प्लॅटीना एमएच १५ एफआर ३१४२ दुचाकीस्वाराचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. दोन मोटारसायकलींमध्ये समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही चालक जखमी झाले. त्यातील मुबीन मनियार यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी नाशिर मनियार यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्लॅटीना स्वाराविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.