नाशिक – फोन रिसिव्ह का करीत नाहीस ? म्हणत विवाहित महिलेचा विनयभंग; आरोपीस अटक
नाशिक : तू माझे फोन रिसिव्ह का करीत नाहीस ? असे म्हणून माहेरी आलेल्या विवाहितेला जवळ ओढून लग्नाअगोदरचा मित्र असलेल्याने एकाने विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पीडितेच्या फिर्यादीवरुन ओमकार अरूण आव्हाड यांच्याविरुध्द म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे, विवाहीत महिला माहेरी आली असतांना तिच्या लग्नाअगोदरचा मित्र ओमकार अरुण आव्हाड याने तिला अडविले. तू माझ्याशी का बोलत नाहीस, असे म्हणत पीडितेच्या घराबाहेर चकरा मारू लागला. फिर्यादी महिला बाहेर कुठे जाण्यासाठी निघाली असता आव्हाड हा तिचा पाठलाग करीत होता. ही महिला रो-हाऊसच्या बाहेर उभी असताना आरोपी ओमकार आव्हाड हा तेथे आला व म्हणाला, तू माझे फोन रिसिव्ह का करीत नाहीस ? असे म्हणून तिला जवळ ओढले, तसेच स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या घटनेनंतर म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ओमकार आव्हाडला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पोलीस हवालदार चौधरी करीत आहेत.
पलंगावरून पडल्याने कैद्याचा मृत्यू
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात झोपेत असतांना पलंगावरून पडल्याने शिक्षा भोगणार्या वृद्ध कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ज्ञानदेव गोपीनाथ पवार (वय ७७) असे पलंगावरून पडल्याने मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे. पवार हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. २८ एप्रिल रोजी रात्री कारागृहात झोपेत असताना तो पलंगावरून खाली पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यास मध्यवर्ती कारागृहात प्रथमोपचार करून जिल्हा शासकीय
रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३ मे रोजी या कैद्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.