नाशिक : हातातील साडेतीन हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून लोखंडी हत्याराने मारहाण करणार्या तीन जणांविरुध्द मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टूरिस्ट कारच्या चालकास पैसे देतांना ही घटना घडली. या मारहाण प्रकरणी हाशिम गफूर अन्सारी (वय ३०, रा. भारतनगर, नाशिक, मूळ रा. मखदूमपूर, जि. जहानाबाद, बिहार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मी व भाचा मासूम अन्सारी आम्ही दोघे मुंबई येथून टुरिस्ट वाहनाने भारतनगर दर्ग्याजवळ रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आले. यावेळी टूरिस्ट कारच्या चालकास पैसे देत असताना भारतनगरकडून आरोपी अरबाज बागवान व त्याचे दोन साथीदार हे आले. त्यानंतर या तिघांनी साडेतीन हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भाचा वाद सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यालाही मारहाण केली. मी जीव वाचवून पळवून जात असताना अरबाज बागवान याने त्याच्या हातातील लोखंडी हत्याराने खांद्यावर व छातीवर मारून दुखापत केली. या फिर्यादीवरुन मुंबई नाका पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.