परिचीत दुचाकीस्वारानेच बॅगेसह महिलेच्या गळयातील मंगळसुत्र लांबविले
नाशिक : अॅटो रिक्षाच्या प्रतिक्षेत असलेल्या दिराच्या हातातील बॅग आणि भावजयीच्या गळयातील मंगळसुत्र परिचीत दुचाकीस्वार त्रिकुटाने पळवून नेल्याची घटना नाशिकरोड येथील के.एन.केला शाळा परिसरात घडली. विशेष म्हणजे ही घटना महिलेच्या पती समक्ष घडली असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल चाफळकर, दहिफोडे व कुरे अशी दिर भावजयीच्या वस्तू पळविणा-यांची नावे आहेत. या प्रकरणी रितिक राजेंद्र पारेचा (२१, रा. गोरेवाडी, नाईकवाडी) या महिलेच्या पतीने तक्रार दाखल केली आहे. पारेचा सोमवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास पत्नी प्रियंका व मावसभाऊ सागर डावरे यांना सोबत घेवून सासरवाडी असलेल्या देवळाली गावात जाण्यासाठी रिक्षाथांब्यावर थांबलेले असतांना ही घटना घडली. के.एन. केला. शाळा परिसरातील रिक्षा थांब्यावर तिघे प्रवासी वाहतूक करणा-या अॅटोरिक्षाची वाट पाहत असतांना दुचाकीवर आलेल्या परिचीत त्रिकुटाने दिर डावरे याच्या हातातील बँग व महिलेच्या गळयातील मंगळसुत्र असा सुमारे ९ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.
……