इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशच्या कोठार गावामध्ये एका व्यक्तीचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे पोलिसांना कळविण्यात आले होते. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि भानगड काही औरच असल्याचे लक्षात आले. तपास सुरू झाला आणि वेगळीच भानगड समोर आली. मृत व्यक्ती वासनांध होता. घरच्या महिलांवरही त्याची वाईट नजर होती. यामुळे चुलत भावानेच मित्रांच्या मदतीने त्याचा खून केला आणि अपघाती मृत्यूचा बनाव रचल्याचे समोर आले आहे.
लल्लन सिंह (४०) असे मृताचे नाव आहे. २० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता पोलिसांना १०० क्रमांकावरून खेरिया कोठार गावामध्ये लल्लन नावाच्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती देण्यात आली होती. पोलिस पोहोचले तेव्हा जवळच वीज तार पडून होती. मात्र, चेहरा आणि डोक्यावर जखमा असल्याने शंका निर्माण झाली होती. पोलिसांनी तपास सुरू केला. सखोल चौकशीत लल्लनचा खूनच झाला असल्याचे निष्पन्न झाले.
विटांनी मारून केली हत्या
पोलिस अधिकारी जैन यांनी सांगितले की, मृताच्या चेहऱ्यावर ज्या जखमा होत्या, त्या विजेच्या धक्क्यामुळे आलेल्या नव्हत्या. विजेचा धक्का लागून मृत्यू हा निव्वळ बनाव होता. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी हत्येची कलमे लावून तपास करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये भूपेंद्र सिंह, घनश्याम, लखन विश्वकर्मा आणि अभय राय यांनी लखन याची हत्या केल्याचे समोर आले. या चौघांनीही लल्लन हा झोपलेला असताना विटांनी मारून केली, असे तपासात उघड झाले.
चारही आरोपी होते त्रस्त
आरोपींनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत लल्लन सिंह हा वासनांध होता. त्याच्या या सवयीमुळे आरोपींच्या कुटुंबातील महिला त्रस्त होत्या. त्या नेहमी मृताबाबत तक्रारी करायच्या. आरोपींनी त्याचा काटा काढण्यासाठी योजना आखली आणि त्याची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, घनश्याम हा मृत लल्लनचा चुलत भाऊ होता. मृताने घनश्यामच्या कुटुंबातील महिलांवर वाईट नजर टाकली होती. त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी ही हत्या घडवून आणली.
Crime Madhya Pradesh Family Member Murder Police Investigation