इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आसाम राज्यातील हजारो पतीवर अटकेची टांगती तलवार आहे. येणाऱ्या पाच- सहा महिन्यांत त्यांना गडाआड जावे लागू शकते. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनीच तसा इशारा दिला आहे. अल्पवयीन मुलींशी लग्न करणाऱ्यांना अटक केली जाणार आसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या विधानानंतर अल्पवयीन मुलांसोबत लग्न करणारे रडारवर आले आहेत.
एका सरकारी कार्यक्रमात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, पोक्सोअंतर्गत १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे. संबंध ठेवणारा मुलीचा कायदेशीर पती असला तरीही, त्याच्यावर कारवाई होते. मुलीच्या विवाहाचे कायदेशीर वय १८ वर्षे असून, कमी वयाच्या मुलींशी लग्न करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा सज्जड दमच त्यांनी दिला. असाममध्ये बालविवाह मोठ्या प्रमाणावर होतात. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर अनेकांची घाबरगुंडी उडाली आहे. पण, मोठ्या प्रमाणावर अटक शक्य नसल्याचेही काही जण सांगत आहेत.
जन्मठेपही होऊ शकते
अल्पवयीन मातृत्त्वाला आळा घालण्यासाठी सरकारने कठोर कायदे आणण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे ठरले आहे. बालविवाह आणि अल्पवयीन मातृत्त्वाला आळा घालण्याप्रतिच्या आपल्या सरकारच्या बांधिलकीचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. अल्पवयीन मुलींशी लग्न करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे ते म्हणालेत.
योग्य वयात लग्नही करा
मातृत्त्वाविषयी बोलताना सरमा म्हणाले की, आम्ही अल्पवयीन मातृत्त्वाच्या विरोधात बोलत आहोत. परंतु, त्याचवेळी स्त्रियांनी आई होण्यासाठी जास्त वेळ थांबू नये. कारण, त्यामुळे गुंतागुंत निर्माण होते. देवाने आपले शरीर अशा प्रकारे तयार केले आहे की, प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वय आहे. मातृत्त्वासाठी योग्य वय २२ ते ३० वर्षे आहे. ज्या महिलांनी अद्याप लग्न केलेले नाही, त्यांनी लवकर करावे, असेही ते हसत हसत म्हणाले.
CM Hemant Biswa Sarma Big Announcement Crime
Husband Minor Girl