इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेमविवाह करताना प्रियकर आणि प्रेयसी यांना त्यांच्या कुटुंबातून विरोध होतो, तर काही वेळा दोन कुटुंबात मोठा वाद देखील होतो. काही वेळा हा वाद इतका तीव्र असतो की, त्याची परिणिती हाणामारीत होते. अशीच घटना उत्तर प्रदेशातील एका गावात घडली.
प्रेमविवाहामुळे संतप्त झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणाच्या आईला भरदिवसा घराबाहेर काढले. त्यांना रस्त्यावर ओढले, विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी उशिरा पीडित महिलेच्या पतीने चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बरेलीच्या फरीदपूरमधील एका गावातील एका महिलेने सांगितले की, पिडीतेच्या मुलाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गावातील एका मुलीशी लग्न केले होते. त्यानंतर मुलीच्या घरच्यांशी वैर असल्याने त्याने पत्नीसह मुलाला हरियाणामध्ये नोकरीसाठी पाठवले. कुटुंबीय शेतात कामावर गेले होते, तेव्हा ती महिला घरात एकटीच होती. त्याचवेळी मुलीच्या बाजूचे सहा जण लाठ्या-काठ्या घेऊन जबरदस्तीने घरात घुसले. त्यांनी मुलाच्या आईला घरातून रस्त्यावर ओढले.
इतके नव्हे तर हल्लेखोरांनी महिलेला नग्न अवस्थेत मारहाण करण्यास सुरुवात केली. या महिलेचा आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले असता आरोपीने धमकी देत पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी गंभीर जखमी महिलेला फरीदपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले, तेथून तिला बरेली जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडितेच्या पतीच्या तक्रारीवरून आरोपी राजेश्वर, धरमपाल, यदुवीर आणि धम्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचे मेडिकल करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रेमविवाहानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.