धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील मोगलाई परिसरात हनुमान मंदिरात चोरीची घटना घडली आहे. चोरांनी चक्क हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेने चोरीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी जालन्यातील मंदिरातूनही प्राचीन मूर्ती चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता धुळ्यातही हनुमानाच्या मंदिरातील मूर्तीच्या डोळ्यावर चोरांनी डल्ला मारला आहे. पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात असून, स्थानिकांच्या चौकशीतून माहिती गोळा करण्याचे काम पोलिस करत आहेत. हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरणाऱ्या चोरांना पकडण्याचे आव्हान सध्या पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
अद्याप जालन्यातील मूर्ती चोरी प्रकरणाच तपास सुरु असताना, या प्राचीन मूर्तीच्या चोरीचा वाद चर्चेत असतानाच, आता धुळ्यातील मंदिरातही चोरी झाली असल्याने राजकारणदेखील तापले आहे. मंदिरांमध्ये होणाऱ्या चोऱ्यांचा तपास व्हावा व लवकरात लवकर चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. या दोन प्रकरणांमुळे मंदिरांच्या सुरक्षेचाही मुद्दाही समोर आला आहे. चोरीचे प्रकार रोखण्यासाठी काय – काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा केली जात आहे.
Crime Jalna And Dhule Hanuman Temple Idol Silver Eye Theft