इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आधुनिक काळात अत्याधुनिक यंत्राचा शोध लागल्यामुळे पोलिसांची अनेक कामे सोपी झाली आहेत. विशेषतः सीसीटीव्ही सारख्या कॅमेऱ्यामुळे कोणताही गुन्हेगार शोधणे सहज शक्य होते. अनेक नागरिक आपल्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवतात. त्यामुळे बाहेर गावी गेल्यानंतर चोरी झाली तर त्याचा शोध घेणे सहज शक्य होते. परंतु भारतात एखाद्या घरावर दरोडा पडला तर ही घटना अमेरिकेत त्या क्षणी माहीत होणे ही आश्चर्याचीच गोष्ट म्हणावी लागेल. परंतु असे प्रत्यक्षात घडले, कानपुर शहरात एका घरावर दरोडा पडला असता त्याची माहिती सीसीटीव्हीमुळे तात्काळ अमेरिकेतील घर मालकाला कळली आणि त्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून या घटनेचा तात्काळ शोध लागला.
श्यामनगर येथील एका बंद घराचे रात्री उशिरा दरोडेखोरांनी कुलूप फोडले. त्याच वेळी घरमालक असलेल्या दोन भावांनी त्यांना अमेरिकेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे घरात प्रवेश करताना पाहिल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना फोनवर माहिती दिली. शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. काही वेळात पोलिस आले, त्यांनी घराला चारही बाजूंनी घेरले, त्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, त्यानंतर एक गोळी दरोडेखोराच्या पायाला लागली. त्याला अटक केल्यानंतर कोठडीत पाठवण्यात आले.
कानपूर शहरातील श्यामनगर येथील एका गल्लीत हरिओम अवस्थी यांचे घर असून त्यांचे खूप पूर्वी निधन झाले आहे. हरी ओम यांची दोन्ही मुले विजय आणि आशुतोष अवस्थी हे एचसीएलमध्ये अभियंता असून ते सध्या अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहतात. मात्र त्यांच्या कानपूरच्या घरी हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. परंतु त्याचे मॉनिटर अमेरिकेत आहे, रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी कॅमेऱ्यात पाच दरोडेखोर घरात शिरताना पाहिले. लगेच भारतात कानपूरला फोन करून शेजाऱ्याला सांगितले. दरम्यान, शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना या चोरीच्या घटनेची माहिती दिली. सदर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मिश्रा हे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलीस फोर्स पाहून दरोडेखोरांनी छतावरून गोळीबार करीत आगीचे बोळेही फेकले. त्यामुळे इन्स्पेक्टरने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यात एका दरोडेखोराच्या पायाला मार लागला. त्यानंतर नेतृत्वाखालील पोलिस पथक उर्वरित चार दरोडेखोरांचा शोध घेत होते.